मित्र एकामागून एक गळ्यात माळा घालून घेत असले तरी आम्ही खंबीर राहून सिंगल लोकांचा किल्ला लढवणार. जरा आठवा, तुमचे ब्रेकअप झाले होते तेव्हा आम्हीच आमचे हे मजबूत खांदे तुमच्या सेवेत हजर केलेले, तुमच्या त्या पिल्लूने ब्लॉक केल्यानंतर रात्रीचा दिवस करून आम्ही तुमच्याशी चॅटिंग केली, तुम्हाला मुव ऑन होण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं तेव्हा बॅग भरून सगळ्यात आधी कोण तयार झालेलं ? तुमचे गम भरे स्टेटस वाचून रिप्लाय कोण देत होतं ? विसरलात ? सगळं काही विसरलात ?
आज आम्हाला असं एकटं मागे सोडून बोहल्यावर चढायला काहीच कसं वाटत नाही. एवढे डेज टू गो, तेवढे डेज टू गो करून आम्हाला चिडवता ? सिंगल लोकांचा पक्ष सोडून मॅरेज क्लब या नव्या पक्षाची स्थापना केली ते केली वर लॉक डाऊन संपताच धडाधड पक्षांतर देखील करून टाकलं ? तुमची खलबते आम्हाला कधी कळलीच नाहीत. आम्हाला वाटले तुम्ही मैत्रीच्या दुनियेतील राजे माणूस पण तुम्ही तर गुपचूप पक्ष बदलून टाकला.
भलेही तुम्हाला त्या पक्षात ग्रोथ दिसली असेल, काही अमिषे मिळाली असतील, म्हणून काय सिंगल पक्षाशी अशी गद्दारी करायची ? लक्षात ठेवा एकदिवस थंडीचे दिवस संपतील, हे दिवस देखील मागे पडतील, तेव्हा आमचीच आठवण येईल. पुन्हा स्वगृही परतण्याची विनवणी करू नका. परतीचे दोर आता आम्ही कापून टाकलेत. गेल्या पक्षात सुखी राहा.
- सुशिल म. कुवर
........
आवर्जून शेयर करू शकता. फोटो प्रतिकात्मक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा